पंचायत समिती मिरजची स्थापना दिनांक ०७/०८/१९६२ रोजी झालेली असून मिरज पंचायत समिती ही सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये मिरज या शहरामध्ये आहे. सदर तालुक्यामध्ये एकूण ६५ गावे असून ६४ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या ३,७१,२८६ इतकी आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ९२२३३.५० हेक्टर इतके आहे. वनक्षेत्राखाली १,५१३ हेक्टर व पडीक क्षेत्र ८,४३७ हेक्टर इतके आहे.
मिरज तालुक्यामध्ये प्रामुख्याने कृष्णा व वारणा या दोन बारमाही वाहणाऱ्या नद्या असून, सदर नद्यांवर कोयना धरण व वारणा नदीवर चांदोली धरण आहे. भोसे येथे निसर्गरम्य दंडोबा डोंगर, हरीपूर येथे संगमेश्वर मंदिर व वारणा व कृष्णा नद्यांचा संगम आहे. मिरज येथे महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भाग असून मिरज येथे रेल्वेचे मोठे जंक्शन, सुप्रसिद्ध मिरासाहेब दर्गा, तंतुवाद्य निर्मिती केंद्र, अद्यावत वैद्यकीय सोयी-सुविधा केंद्र आहे.
तसेच सांगली येथे सुप्रसिद्ध पटवर्धन संस्थानकाळातील पुरातन गणपती मंदिर, भुईकोट किल्ला, वस्तुसंग्रहालय, सुंदर निसर्गरम्य कृष्णाघाट, १ वर्षापूर्वीचा आयर्विन पूल, मार्केट यार्ड येथील जगप्रसिद्ध हळद बाजार आहे. मिरज तालुक्यातील सांगली हे नाट्यपंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, सुप्रसिद्ध सिने संगीतकार बाळ पळसुले, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, काळू-बाळू तमाशा कलावंत, भारताची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळाडू स्मृती मानधना, हिंदकेसरी पै. मारुती माने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राजस्थानचे राज्यपाल मा. वसंतदादा पाटील इत्यादी सुप्रसिद्ध मान्यवरांमुळे मिरज तालुका प्रसिद्ध आहे.
तालुक्यामध्ये द्राक्ष, ऊस, केळी, हळद, सोयाबीन व इतर कडधान्य तसेच सर्व प्रकारची पीके घेतली जातात. यामध्ये ऊस, द्राक्ष, बेदाणा व हळद निर्मिती मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यामध्ये दोन सहकारी कारखाने असून आशियाखंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून सांगली येथील मा. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना प्रसिद्ध आहे.
तालुक्याचे हवामान मिश्र असून त्यामधील पश्चिम भाग हा पावसाचा व बागायत क्षेत्रामध्ये येतो, तर पूर्व भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात समाविष्ट होतो. तालुक्याचे सरासरी प्रजन्ममान ४५३ मि.मी. इतके आहे. मिरज तालुक्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ व तीन विधानसभा मतदारसंघ असून जिल्हा परिषदेचे ११ गट आणि पंचायत समितीचे २२ गण आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र - ८ व उपकेंद्र - ४९ असून, आयुर्वेदिक दवाखाना १ आहे. पशुवैद्यकीय दवाखाने जिल्हा परिषदेचे ७ व राज्य शासनाचे १४ आहेत.
शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या १७३ शाळा असून, आरग येथील आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून नामांकित आहे. त्याचबरोबर तालुक्यातील १५ शाळा मॉडेल स्कूलसाठी निवडण्यात आलेल्या आहेत. खाजगी प्राथमिक ४८ शाळा व खाजगी माध्यमिक ८८ शाळा आहेत. बालविकास प्रकल्पांतर्गत ४३० अंगणवाड्या आहेत. मिरज तालुक्यामध्ये ३ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना असून सदरच्या योजना सुस्थितीत कार्यान्वित आहेत.
वरीलप्रमाणे तालुक्यातील महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची थोडक्यात माहिती व्हावी, या दृष्टिकोनातून काही प्रसिद्ध स्थळांचा संदर्भ तसेच भौगोलिक व इतर माहितीचे वर्णन करण्यात आलेले आहे.